मराठा समाजातील युवक व युवतींना मिळतेय मोफत संगणकाचे प्रशिक्षण

mhcitynews
0

ग्रामसभेत जाऊन सारथीच्या लाभार्थ्यांनी दिली योजनेबद्दल माहिती

तुळजापूर प्रतिनिधी 

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था, पुणे अर्थात 'सारथी' यांच्यावतीने एमकेसीएल मार्फत संपूर्ण राज्यभर ६ महिन्याचे मोफत संगणक प्रशिक्षण दिले जात आहे. सारथी व एमकेसीएल मार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी 'छत्रपती शाहू महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉईबिलिटी अँड इन्हान्समेंट प्रोग्राम' (CSMS-DEEP) चे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. सदर सहा महिन्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमात युवक युवतींना चार टप्प्यात इरा या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने इंग्रजी संभाषण कौशल्य, मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल व पावरपॉइंट, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट, वेब डिझाईनिंग, ॲडव्हान्स कॉम्प्युटर अकाउंटिंग इत्यादी कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. 

तुळजापूर शहरातील अष्टभुजा कॉम्प्युस्किल्स अँड करिअर डेस्क या एमकेसीएलच्या अधिकृत प्रशिक्षण संस्थेत एकूण ३० युवक व युवती प्रशिक्षण घेत आहेत. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सारथीच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार या कोर्सच्या लाभार्थींनी सारथी संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती ग्रामसभेत देण्याचे ठरवले आहे. शासनाच्या सूचनेनुसार एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक धनंजय जेवळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे कु. ऋतुजा वडणे, बसवंतवाडी येथे कु. अंबिका मोरे व कु. मनीषा मुळूक, मंगरूळ येथे कु. अवंतिका साठे व सांगवी येथे कु. तेजश्री पवार या लाभार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सारथीच्या उपक्रमाची माहिती ग्रामपंचायत मध्ये दिल्याची माहिती संचालिका सोनाली आनंद मुळे यांनी दिली आहे.

समाजातील गरजू लाभार्थी विध्यार्थांनी संपूर्ण प्रशिक्षण काळात पूर्ण वेळ देऊन 'छत्रपती शाहू महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉईबिलिटी अँड इन्हान्समेंट प्रोग्राम' अंतर्गत एकूण 30 विद्यार्थी कोर्स पूर्ण करणारे पहिले सेंटर असल्याची माहिती अष्टभुजा कॉम्प्युस्किल्स अँड करिअर डेस्कच्या संचालिका सोनाली मुळे यांनी दिली.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top