![]() |
| महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतून करिअरच्या संधी' या विषयावर वाणिज्य शाखेतील तज्ञ डॉ. आनंद मुळे सर मार्गदर्शन करताना. |
तुळजापुर प्रतिनिधी
तुळजापूर शहरातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतून करिअरच्या संधी' या विषयावर वाणिज्य शाखेतील तज्ञ डॉ. आनंद मुळे यांचे गुरुवार दि.8 रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
डॉ. आनंद मुळे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शन पर व्याख्यानात वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमातील विविध विषय व्यवसायभिमुख व करिअरशी संबंधित कसे आहेत याची माहिती दिली. वाणिज्य शाखेतून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बँकिंग, विमा, गुंतवणूक, भांडवल बाजार, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार, चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी या विविध क्षेत्रात असणाऱ्या करिअरच्या मोठ्या संधी या विषयी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी जर भविष्यात नोकरी ऐवजी उद्योग व्यवसाय करण्याचा मार्ग निवडला तर वाणिज्य शाखेतील ज्ञान हे कसे फायदेशीर ठरते याची सविस्तर माहिती ही विद्यार्थ्यांना देण्यात आली. कार्यक्रमास म.वि.रा. शिंदे प्रशालेचे मुख्याध्यापक आर. बी. यलगोंडे , सहशिक्षक पी. बी. क्षीरसागर तसेच के. डी. घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर सारंग वेदपाठक, वैष्णवी गायकवाड या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
