सिद्दीक पटेल
विधानसभेच्या निवडणुका, लवकरच होणार असून, आमदारकीचे डोहाळे लागलेल्या स्वयंघोषित इच्छुकांनी मतदार संघातील सत्तेचा सोपान गाठण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कंबर कसत आपले दुकान थाटण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे.
विधानसभेच्या ज्या जागा शरद पवार गटाकडून लढवल्या जाणार आहेत, त्या मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली होती. त्याच अनुषंगाने महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या, शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा धाराशिव जिल्ह्यात दाखल झालेली आहे. आज दि. 14 ऑगस्ट ला सकाळी तुळजापूर मध्ये मेळावा होणार आहे. यानिमित्ताने आमदारकीची स्वप्न, डोहाळे लागलेल्या इच्छुक मंडळींनीआप-आपली दावेदारी, मोकाट समाज माध्यम आणि पेड न्यूज मधून बाजारात मांडायला सुरुवात केलेली आहे. उथळ भाषा, शैली वापरून, समाज माध्यमात लोकप्रियता मिळवलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचा गवगवा जास्तच सुरू झालेला आहे. निवडणुका आल्या की, तुळजापूर मतदारसंघात, फिरायचे, पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करायचे आणि, पक्षाकडून संधी न मिळाल्यास, सोईच्या पक्षातून निवळणूक लढवण्याचा धंदा, तथाकथित अनेक मंडळींनी सुरू केलेला आहे.
तुळजापूर विधानसभा ही काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काही दिवसापूर्वीच मराठवाडा विभागीय बैठक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये तुळजापूर तालुक्यासाठी ९ उमेदवारांनी मुलाखत दिली. तर मतदार संघात एकूण 10 ते 15 इच्छुकांनी आमदार होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बाधलेले आहे. यापैकी अनेकांनी दबाव गट निर्माण करून आपले वजन वाढवण्यासाठी गाव भेट अभियान, दौरे सुरू केलेले आहेत.
तुळजापूरची विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा असलेल्या, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या लाडक्या स्वयंघोषित, माजी जि प. सदस्यांनी, स्वतःची दावेदारी, समाज माध्यमातून विधानसभेच्या बाजारात मांडला सुरुवात केलेली आहे. एका आमदारकीसाठी, दीड डझन च्या पुढे, इच्छुक तयारीला लागल्याने, तुळजापूर विधानसभा मतदारसंघासह जिल्हाभरात सध्यातरी सामान्य जनतेचे मनोरंजन सुरु झालेले आहे.
