लोकसभेच्या अपयशामुळे लाडकी बहीण योजना ; विधानसभा निवडणुकीत ही फसवी योजना सत्ताधार्‍यांना धडा शिकवेल

mhcitynews
0


अशोक जगदाळे यांच्या कार्यकर्त्यांनी गाजवली सभा 

सिद्दीक पटेल 

लोकसभा निवडणुकीत महायुतीला आलेल्या अपयशामुळेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत ही फसवी योजना सत्ताधार्‍यांना धडा शिकवेल, व्यवहारात पैसा आणि नात्याला महत्त्वाचे स्थान असते. सरकारला पंधराशे रुपये देऊन नाते विकत घेता येते, असाच समज झाला आहे. अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा तुळजापूर शहरात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, माजी आमदार राहुल मोटे, ज्येष्ठ नेते जीवन गोरे, अशोक जगदाळे, माजी आमदार जयदेव गायकवाड, जिल्हाध्यक्ष संजय पाटील-दूधगावकर, संजय  निंबाळकर, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, आदित्य गोरे, आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.


प्रसंगी परंडा येथून तुळजापूर येथे शिवस्वराज्य यात्रेचे आगमन झाले. या यात्रेचे तुळजापूर मतदार संघात जोरदार स्वागत करण्यात आले राज्य कार्यकारणी सदस्य अशोक भाऊ जगदाळे यांच्या वतीने ठिक ठिकाणी स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले होते. सभा सुरु होण्या आधी जगदाळे समर्थकांनी मोठी रॅली काढत सभा स्थळी पोहचत शहर तुतारीमय करत सभा स्थळी एकच गर्दी केली. खासदार अमोल कोल्हे, व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषणा दरम्यान जगदाळे समर्थकांनी घोषणाबाजी करत उमेदवारी मागत सभा गाजवली.


खासदार अमोल कोल्हे बोलताना म्हणाले की, हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा आहे. शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत, त्यांचा आदर्श जागृत करणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्रात गद्दारी आणि भ्रष्टाचार यांचे नांगर फिरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीत औरंगजेबाला महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे काय हे दाखवून दिले. आज मात्र दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक होण्यासाठी आमच्या नेत्यांना वेश बदलून जावे लागते असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावला आहे. 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top