तुळजापूर प्रतिनिधी
आजामील हा पवित्र कुळात जन्मला होता. तरी तो एका वेश्येच्या आहारी गेल्यामुळे त्याने सर्व संसार सोडून त्या वेश्येला घरी आणले व तिच्यासाठी चोऱ्या चपाट्या चालू केल्या, आयुष्यभर पाप केल्यामुळे मरते समयी त्याला न्यायला यमदूत आले. आजामेलाच्या लहान मुलाचे नाव नारायण असे होते. त्याने यमदुतांचे दर्शन करताच घाबरून छोट्या मुलाचे नाव उच्चारले नारायण नारायण नारायण तेंव्हा ते नाव ऐकून विष्णू दूत त्या ठिकाणी आले व त्यांनी आजामील याची यमदुतांपासून रक्षा केली.
या आजामील चरित्रावरून भगवंत नामाची शक्ती आपल्याला अनुभवाला येते. आजामीलने एकदाच नारायण नाव घेतले तरी विष्णू दूत आले. मग जो व्यक्ती आयुष्यभर हरिनाम घेईल त्याचे कल्याण भगवंत नाहीत का करणार ? तसेच काल कृष्ण जन्म देखील झाला. भगवत गितेत असं सांगितलं आहे कि जो व्यक्ती भगवंताच्या जन्म आणि कर्म जाणतो तो हा देह सोडल्यानंतर परत वैकुंठला निघून जातो.
"गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा
बाळकृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारी
गुडिया तोरणे, करिती कथा गती गाणे
तुका म्हणे छंदे येणे वेधिली गोविंदे"
या अभंगाने कृष्ण जन्म साजरा केला.
सर्वांनी हरिनाम घ्यावे, त्याचे फळ नक्कीच मिळते. म्हणून सर्वांनी कृष्ण भावना भावित व्हावे असे आवाहन श्रीमान श्रवण भक्ती प्रभुजी यांनी केले. कथेला 500 ते 600 भाविक उपस्थित होते . कथेनंतर हरिनाम संकीर्तन, आरती, होऊन सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

