तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील मौजे चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर व चिवरी पाटी रस्त्याच्या दोन्ही बाजूला जोड रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून यामुळे वाहन चालकांसह देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने सदरील रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यासंदर्भात वेळोवेळी प्रशासन दरबारी निवेदन देऊन मागणी केली होती.
जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यावतीने मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव यांना महालक्ष्मी मंदिर देवस्थान ते नळदुर्ग रोड येथील चिवरे पाटील कामान पर्यंत रोड दुरुस्ती करण्याबाबत पत्रव्यवहार केला. मात्र याला सुमारे एक वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग हे झोपेचे सोंग घेत आहे.
रस्ता खड्ड्यामुळे जागोजागी उखडला गेला आहे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते, खड्ड्यामुळे वाहने वेगाने जाऊ शकत नाहीत यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. खड्ड्यामुळे अनेक अपघातांना निमंत्रण मिळत आहे त्यामुळे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांनी दिला.
