तुळजापूर प्रतिनिधी
युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सचिव आदित्य पाटील तुळजापूर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून तशी मागणी त्यांनी खा. शरद पवार यांचेकडे केली आहे. आदित्य पाटील हे शेकापचे संस्थापक सदस्य माजी खासदार उध्दवराव पाटील यांचे नातू आहेत.
धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षक पदावर कार्यरत असलेले आदित्य पाटील हे युवक राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेश सचिव म्हणूनही काम पहात आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांनी नुकतीच पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेवून तुळजापूर विधानसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. तसेच पक्षाने युवकांना संधी देण्याचे ठरविल्याने आदित्य पाटील यांची मागणी लक्षवेधी ठरत आहे. आदित्य पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य उद्धवराव पाटील यांचे नातू आहेत. कै. उध्दवराव पाटील यांनी त्यांचे राजकीय कार्यकाळात विधानसभा, लोकसभा गाजवली हेाती. ते संयुक्त महाराष्ट्र समितीचे सदस्यही होते. मराठवाडा मुक्ती संग्रामात त्यांचा मोठा सहभाग होता. महाराष्ट्र विधानसभेत ते विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत असताना त्यांनी शेतकर्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला होता. या पार्श्वभूमीवर आदित्य पाटील यांना घरातुनच राजकीय बाळकडू मिळाले आहे. त्यामुळे आदित्य पाटील यांची उमेदवारीची दावेदारी ही बळकट समजली जात आहे
