चिवरी महालक्ष्मी मंदिर रस्ता दुरुस्तीला ठेकेदारांचा ब्रेक – प्रशासनही गप्प, ग्रामस्थ आक्रमक!

mhcitynews
0

 

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी मंदिराच्या रस्त्याची दुरुस्ती ठेकेदाराने रामभरोसे सोडली असून प्रशासनाचेही दुर्लक्ष सुरूच आहे. निकृष्ट कामाबाबत ग्रामस्थांनी आवाज उठवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला यात्रेपूर्वी रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले. मात्र यात्रा अवघ्या बारा दिवसांवर येऊन ठेपली असताना देखील ठेकेदार कामाला हातही लावत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.


साईड पट्ट्यांचा दिखावा, मुख्य रस्त्याची अवस्था जैसे थे!

गेल्या महिन्यात झांबरे वस्ती ते साठवण तलाव दरम्यानचा रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली निकृष्ट दर्जाच्या कामाने तयार करण्यात आला. त्याबाबत तक्रारी येताच अधिकाऱ्यांनी पाहणी करून पुन्हा दुरुस्तीचे आदेश दिले. मात्र, ठेकेदाराने फक्त साईड पट्ट्या भरून काम केल्याचा दिखावा केला आहे.


ठेकेदाराला अभय कोणाचे? आंदोलनाचा इशारा!

ठेकेदार प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून गप्प बसला असला तरी कोणत्या मोठ्या व्यक्तीच्या आशीर्वादाने तो निर्धास्त आहे? असा सवाल ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. यात्रेच्या तोंडावर हा रस्ता तातडीने दुरुस्त न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


भाविकांचा जीव धोक्यात – कोण घेणार जबाबदारी?

यात्रेच्या काळात हजारो भाविक या रस्त्याने प्रवास करणार आहेत. जर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एखादा गंभीर अपघात झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा थेट सवाल ग्रामस्थ आणि भाविक विचारत आहेत.


तोडगा लवकर निघाला नाही, तर आंदोलन अटळ!

ग्रामस्थांनी प्रशासनाला अल्टिमेटम देत तातडीने सक्षम कारवाई करून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.


> प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे भाविकांचे हाल सुरूच – आता ग्रामस्थ रस्त्यावर उतरले तर जबाबदार कोण?






Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top