![]() |
| संग्रहीत फोटो |
धाराशिव प्रतिनिधी
उमरगा-नळदुर्ग-धाराशिव हा राष्ट्रीय महामार्ग हा मराठवाडा आणि कर्नाटक जोडणारा महत्त्वाचा दळणवळण मार्ग आहे. दिवसेंदिवस या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढत असून, रस्त्याची दुरवस्था व अपुरी रुंदीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या महामार्गाच्या तातडीने चौपदरीकरणाची मागणी जोर धरत आहे.
या संदर्भात आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. मधुकर बबनराव शेळके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. नितीन गडकरी यांना निवेदन देऊन त्वरित कार्यवाहीची मागणी केली आहे.
"निवडणुकीदरम्यान या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आश्वासन देण्यात आले होते, तसेच निधीही जाहीर करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात चौपदरीकरणाचे काम सुरू झालेले नाही. केवळ काही भागांवर प्राथमिक कामे सुरू असून, ती अपुरी आहेत. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे," असे श्री. शेळके यांनी सांगितले.
रस्ता अरुंद असल्यामुळे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांचे प्राण जात आहेत. तसेच, वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाढत आहे, परिणामी या मार्गावरील व्यापार, उद्योग आणि आर्थिक विकासालाही फटका बसत आहे.
नागरिकांना प्रवासाच्या सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि हा प्रकल्प तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी त्यांनी केली.
यासोबतच, या निवेदनाची प्रत संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना पाठवून लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे. आता केंद्र सरकार या मागणीला कसा प्रतिसाद देते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
