पुजारी नगर फाउंडेशनने पालिकेकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी
तुळजापूर प्रतिनिधी
नळदुर्ग रोड परिसरातील पुजारी नगर, हनुमान नगर आणि मस्के प्लॉटिंगमध्ये गेल्या 15 दिवसांत तब्बल 30 डुकरांचे मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे शहरात स्वाइन फ्लू किंवा तत्सम साथीचा रोग पसरतो आहे का? याची तात्काळ चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुजारी नगर फाउंडेशनने नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण
या परिसरात दिवसेंदिवस मृत डुकरांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक ठिकाणी पडलेल्या मृत डुकरांमुळे दुर्गंधी पसरत असून, आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रहिवाशांना साथीच्या रोगाच्या धोक्याचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
डुकरांचा बंदोबस्त आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मागणी
या पार्श्वभूमीवर मोकाट डुकरांवर तातडीने नियंत्रण आणावे, डुक्कर व्यवसायिकांना योग्य ती सूचना द्यावी आणि स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, परिसरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या निवेदनावर पुजारी नगर फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी, सोमनाथ पुजारी, बालाजी नरवडे, मल्लेश विभुते, विशाल शिंदे यांसह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
