तुळजाभवानी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
तुळजापूर प्रतिनिधी
“शिवरायांनी महाराष्ट्राला सामाजिक आणि राजकीय गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हे न्याय, नीती आणि परधर्मसहिष्णुतेचे प्रतीक होते. आजच्या काळातही आपण या मूलभूत तत्त्वांचा अंगीकार करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जीवन पवार यांनी केले.
तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर येथे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. पवार, गुरुदेव कार्यकर्ते अंकुश बेळंबे आणि तुकाराम शिंदे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. पवार म्हणाले, "शिवरायांचे राज्य हे केवळ तलवारीच्या बळावर नव्हे, तर न्याय, नीती आणि लोककल्याणकारी धोरणांवर उभे होते. महिलांच्या सन्मानासाठी त्यांनी कठोर नियम लागू केले. शत्रूपक्षातील स्त्रियांना साडी-चोळी देऊन सन्मानपूर्वक घरी पाठवण्याची संस्कृती त्यांनी स्वराज्यात रुजवली. भ्रष्टाचाराला थारा नव्हता, तर शेतकरी जगला तरच राज्य समृद्ध होईल, या तत्त्वावर त्यांनी राज्यकारभार केला. आजच्या समाजाने आणि व्यवस्थेनेही या तत्त्वांचा विसर पडू देऊ नये."
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जे. बी. क्षीरसागर यांनी केले, तर प्रा. व्ही. एच. चव्हाण यांनी आभार मानले. या वेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
