धाराशिव जिल्हा मजूर संघाच्या निवडणुकीत तुळजापूर तालुका मतदारसंघातून नारायण भाऊ नन्नवरे यांनी ऐतिहासिक हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. सलग तिसऱ्यांदा त्यांची बिनविरोध निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे.
श्री. नन्नवरे यांचा कामाचा ठसा आणि संघटनेतील भक्कम नेतृत्व यामुळेच त्यांना तिसऱ्यांदा बिनविरोध संधी मिळाल्याचे जाणकारांचे मत आहे. मजूर संघाच्या विकासासाठी त्यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, श्रमिकांच्या हक्कांसाठी घेतलेली भूमिका आणि संघटनात्मक बांधणीमुळेच त्यांच्यावर विश्वास टाकण्यात आला आहे.
या विजयाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत व पेढे वाटून आनंद साजरा केला. या निवडीबद्दल नारायण भाऊ नन्नवरे यांनी कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे आभार मानले व आगामी काळात श्रमिकांच्या हितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.