ज्ञानी होण्यापेक्षा प्रेमी व्हा - प्रजापती विष्णुदास

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

कलियुगात माणसाने ज्ञानी होण्यापेक्षा भगवंताचे प्रेमी व्हा, असा संदेश प्रजापती विष्णुदास- इस्कॉन धाराशिव यांनी दिला. समाजात ज्ञानी माणसे भरपूर आहेत; परंतु संसारा इतके भगवंतावर प्रेम नाही. भगवंतावर प्रेम असणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळेच भगवंत भक्ताला आपलेसे करतात. सुदामा व संत तुकाराम महाराज यांचे भगवंतावर निस्सीम प्रेम होते. त्यांनी सर्वस्व भगवंताला वाहिले होते म्हणूनच तुकाराम महाराजांना नेण्यासाठी विमान आले होते व सुदामाची पूर्ण नगरी सोन्याची केली होती. सुदाम्याच्या मुठभर पोह्याला भगवंतांनी एवढी संपत्ती दिली आपण जर आयुष्यभर सतत भगवंताचे नामस्मरण केले तर याच जन्मात आपल्याला भगवंतप्राप्ती शक्य आहे. असे प्रभुजी म्हणाले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, माऊली महिला भजनी मंडळ आयोजित श्रीमद् भागवत कथेच्या शेवटच्या दिवशीच्या कथेत ते बोलत होते.

ठेविले अनंते तैसेची रहावे । चित्ती असू द्यावे समाधान ॥ हे ब्रीद वाक्य फक्त सुदामा व तुकाराम महाराज यांनाच लागू पडते, असे प्रभुजी म्हणाले.

प्रत्येक व्यक्तीच्या मागे काही ऋण असतात पितृऋण - भक्तीने , ऋषीऋण - अध्ययनाने, देवऋण - हरिनामाने फेडायचे असतात. वैष्णवांचा अपराध केला म्हणून भगवंतांनी यादव कुळाचा नाश केला. वैष्णव अपराध घोर अपराध असून त्याचे फळ त्याला भोगावेच लागते. कलियुगात धर्म व ज्ञान फक्त भागवत ग्रंथातच असल्याचे प्रभुजींनी सांगितले. कलियुगात मनुष्याचे आयुष्य कमी होत असून यापुढील काळात आई वडील बहिण - भाऊ असे नाते फारसे दिसणार नसल्याचे प्रभुजींनी सांगितले व सध्या समाजात घडत असणाऱ्या सत्य घटनाही त्यांनी सांगितल्या. शेवटी भागवताचा सार म्हणजे भगवंताचे सतत नामस्मरण हाच असल्याचे त्यांनी सांगितले. कथेनंतर संकीर्तन व आरती होऊन भव्य अशी ग्रंथदिंडी काढली होती. दिंडीमध्ये 5 वर्षापासून 80 वर्षापर्यंतचे महिला व पुरुष यामध्ये पारंपारिक वेशभूषा मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. नगर प्रदक्षिणा होऊन महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली. यावेळी 400-500 भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top