तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवकांनी कार्यालयात दररोज हजेरी लावावी आणि त्यांच्या उपस्थितीची खातरजमा व्हावी यासाठी ‘थंब मशीन’ सक्रीय करावी, अशी जोरदार मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्ष दिनेश सुनील बागल यांनी केली आहे.
या मागणीसाठी त्यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती तुळजापूर यांना लेखी निवेदन दिले असून, त्यात ग्रामसेवक अनेक वेळा कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याने गावातील सर्वसामान्य नागरिकांचे कामे खोळंबतात, असा ठपका ठेवण्यात आला आहे.
या निवेदनात नमूद केले आहे की, दररोज किमान २ तास तरी ग्रामसेवक कार्यालयात उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यांचा गैरहजेरीमुळे गोरगरीब शेतकरी व गावकरी यांचे कामकाज अडते. यामुळेच थंब मशीनद्वारे हजेरी सक्तीची करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी तुळजापूर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दिनेश बागल मनोज माडजे दयानंद शिंदे शिवलिंग कोरे वैभव देशमुख योगेश रोकडे सयाजी शिंदे बुद्धभूषण सोनवणे आकाश जमदाडे शुभम सुरवसे रविराज हांडे अक्षय कापसे गुणवंत देशमुख यांच्यासह युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
