शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी हेक्टरी ५० हजारांचे सरसकट अनुदान द्यावे – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची मागणी

mhcitynews
0

 


धाराशिव प्रतिनिधी

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीप पिके अतिवृष्टीमुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. सोयाबीन, उडीद, मूग, कांदा आदी पिकांचे १०० टक्के नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरलेले नाही. अशा बिकट परिस्थितीत शेतकरी जगावा व रब्बी हंगामाचे नियोजन करू शकेल याकरिता शासनाने तातडीने मदतीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे.


सध्या प्रशासनाने पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे झालेल्या नुकसानीतून शेतकऱ्याला काहीच मिळणार नाही. खते, बियाणे, औषधे व मशागतीवरील सर्व खर्च वाया गेला असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने सर्व निकष बाजूला सारून शेतकऱ्यांच्या सहानुभूतीने विचार करून प्रति हेक्‍टरी रुपये ५० हजार, जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत सरसकट मदत जाहीर करावी, अशी ठाम मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


"ही मदत मिळाली तरच शेतकरी सावरून उभा राहील. अन्यथा सध्याच्या नुकसानीतून शेतकऱ्याला मार्ग काढणे अशक्य आहे," असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.


यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी गायकवाड प्रगतशील शेतकरी रवी कापसे, बाबा इंगळे, विनोद पाटील, हंगरगेकर,म्हेत्रे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top