धान्यात चक्क अळ्या ! अन्नसुरक्षेचा बोजवारा – जनहित संघटना आक्रमक, प्रशासनाला झटका

mhcitynews
0

सार्वजनिक वितरण योजनेतील गंभीर निष्काळजीपणा – तहसीलदारांकडे तक्रार दाखल, दोषींवर कारवाईची मागणी


तुळजापूर / सिद्दीक पटेल

जनतेच्या अन्नावरच अळ्या रांगताना दिसणं हे शासनाच्या यंत्रणेच्या निष्काळजीपणाचं जिवंत उदाहरण आहे. तुळजापूर तालुक्यातील अमृतवाडी येथील नागरिकाला शिधा दुकानातून मिळालेल्या तांदळात चक्क अळ्या आढळल्याने ग्रामस्थ आणि जनहित संघटना आक्रमक झाली आहे.


गोपाळ बाबुराव घंदुरे या नागरिकाने दि. १० ऑक्टोबर रोजी आपल्या रेशन कार्डद्वारे १२ किलो तांदूळ 4 किलो गहू, 4 किलो ज्वारी घेतला. परंतु घरी पोहोचल्यावर त्या धान्यात अळ्या आढळल्याने धक्का बसला. संबंधित दुकानदार जालिंदर रामचंद्र जाधव यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही, उलट दुर्लक्षाचे धोरण घेतले. परिणामी नागरिकाने तहसीलदार, तुळजापूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.


या प्रकाराने जनहित संघटना आक्रमक झाली असून “जनतेच्या थाळीत सरकारने अळ्या वाढवल्या आहेत काय?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी संबंधित दुकानदारासह पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी अजय साळुंखे, प्रशांत सोंजी, संतोष भोरे,लक्ष्मण नन्नवरे, तक्रारदार घंदुरे आदी उपस्थित होते.


जनतेचे आरोग्य धोक्यात, अधिकारी मूकदर्शक!

सार्वजनिक वितरण योजनेतून मिळणारे धान्य गरीब आणि सर्वसामान्यांच्या जगण्याचा आधार आहे. अशा अन्नधान्यात अळ्या सापडणं म्हणजे थेट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणं होय. प्रश्न असा उपस्थित होतो की, धान्य साठा तपासणी करताना पुरवठा विभाग झोपेत असतो का?


तपास व कारवाईची मागणी

या घटनेची चौकशी करून जबाबदार अधिकारी व दुकानदाराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जनहित संघटना आणि नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने तत्काळ साठा तपासणी करून दोषींना शिक्षा न दिल्यास मोठं आंदोलन उभं राहील, असा इशारा जनहित संघटनेकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top