तुळजापूर / सिद्दीक पटेल
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात अनेक दिवसापासून सोनोग्राफी मशीन नसल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय सुरू आहे. गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना तपासणीसाठी आता खाजगी दवाखान्यांचे दार ठोठवावे लागत आहे, हे प्रशासनाच्या ढिसाळपणाचे ज्वलंत उदाहरण ठरत आहे.
पूर्वी कार्यरत असलेली सोनोग्राफी मशीन अचानक बंद पडली, पण त्या मागचं खरं कारण कोण सांगणार? दोषींवर कारवाई झाली का? — हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे असली तरी संबंधित डॉक्टर अनुपस्थित, त्यामुळे लाखो रुपयांची यंत्रणा धूळ खात पडली आहे. ही केवळ निष्क्रियता नव्हे तर जनतेच्या पैशाचा अपमान आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी बसवलेली सिटीस्कॅन मशीन अद्याप सुरूच झालेली नाही! लोकांचे आरोग्य धोक्यात असताना प्रशासन मात्र गाढ झोपेतच आहे, अशी टीका होत आहे.
“रुग्णांच्या जीवाशी चाललेला हा खेळ त्वरित थांबवावा, अन्यथा जनतेच्या रोषाचा सामना करावा लागेल,”असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष बबनराव गावडे व अशोकराव साळुंके यांनी निवेदनाद्वारे दिले.
