सत्तेची ऊब घेण्यासाठी ‘ज्याची त्याची’ धडपड सुरू !
तुळजापूर / सिद्दीक पटेल
कडाक्याच्या थंडीत वातावरण जरी गारठले असले, तरी तुळजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या वाऱ्यांनी राजकारण तापायला सुरुवात केली आहे. सत्तेच्या ऊबेच्या शोधात राजकीय शेकोट्या पेटल्या आहेत आणि या शेकोट्यांभोवती बसून प्रत्येक गट आपापली रणनीती आखताना दिसत आहे.
या शेकोटीभोवती बसलेले काहीजण ‘जुने ऊबदार’ संबंध पुन्हा तापवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काही नव्या गठबंधनाची ठिणगी टाकत आहेत. आरोप-प्रत्यारोपांचे निखारे उडत असून प्रत्येक जण या राजकीय आगीत स्वतःचा वाटा तापवू पाहत आहे. काहीजण समोरून पेटलेले दिसतात, तर काही मात्र सावल्यांमध्ये बसून योग्य क्षणाची वाट पाहत आहेत.
राजकीय पातळीवर पाहता, तुळजापूरमधील ही निवडणूक ही फक्त नगरपरिषदेची नाही, तर जिल्ह्यातील पुढील राजकीय समीकरणांची झलक देणारी ठरणार आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांमधील हालचालींमुळे ही निवडणूक दोन्ही प्रतिष्ठांच्या चौरंगावर खेळली जात आहे. याशिवाय राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतील स्थानिक समन्वयाचाही ताण स्पष्टपणे जाणवतो.
शहरातील प्रत्येक प्रभागात संभाव्य उमेदवार जनसंपर्क वाढवत आहेत. गल्ली-गल्लीमध्ये ‘आमचा नगरसेवक’ होण्याच्या स्पर्धेला वेग आला आहे. काही ठिकाणी सामाजिक कार्याच्या नावाखाली प्रचाराला सुरुवात झाली आहे, तर काहीजण अजूनही ‘पक्षाची तिकिटे’ निश्चित होण्याची प्रतीक्षा करत आहेत.
मतदारांमध्येही निवडणुकीची हलचल जाणवू लागली आहे. स्थानिक विकास, पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छतेचे प्रश्न हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. तथापि, मतदारांनाही ठाऊक आहे की ही निवडणूक फक्त प्रश्नांवर नव्हे, तर गटबाजीच्या समीकरणांवर लढवली जाणार आहे.
थंडी जशी वाढते, तशी या शेकोट्यांची ऊबही वाढणार आहे. कोणाची आग तेज धरते आणि कोणाची राख उडते — हे येणारे दिवस ठरवतील. मात्र, सध्या तुळजापूरचे राजकारण हे जणू धुक्यात झाकलेली शेकोटीच आहे — ज्यात कुणी हात तापवतोय आणि कुणी हात जळवून घेतोय!
