तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची कॉर्नर सभा; विकासाच्या आश्वासनांवर भर

mhcitynews
0

 


तुळजापूर / सिद्दीक पटेल 

नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण तापत असताना आर्य चौक येथे झालेल्या भाजपच्या कॉर्नर सभेत आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी विकासाची अजेंडा पुन्हा आघाडीवर आणत मतदारांशी संवाद साधला. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या  व प्रभाग क्रमांक 4 च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी तुळजापूरच्या ‘कायापालटाचे शिवधनुष्य’ हातात घेतल्याचा दावा करत नागरिकांकडून व्यापक पाठिंबा मागितला.


आ. पाटील यांनी शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांच्या “उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आवश्यक विकासकामे गतिमान करण्याची वेळ आली आहे” असे सांगत प्रमुख प्रकल्पांची माहिती देत विकासाचा रोडमॅप केंद्रस्थानी घेतला 2019 मध्ये झालेले रेल्वे भूमिपूजन शहरात यात्रेकरूंची वाढ आणि अर्थचक्र गतीमान करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हुतात्मा स्मारक ते पावनारा गणपती चौक रस्ता या महत्त्वाच्या कामासाठी 52 कोटींची तरतूद झाल्याचे त्यांनी जाहीर केले. प्रभाग 4 व 7 मधील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी आराखड्यात विशेष तरतूद केली असल्याचेही त्यांनी नमूद केले. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात महाद्वारातून प्रवेशाची मागणी मान्य झाल्याचेही त्यांनी सांगितले.


विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका, ‘काम करणारे’ आणि ‘गप्पा मारणारे’ यातील फरक अधोरेखित

सभेत पाटील यांनी विरोधकांवर शब्दबाण सोडत, “सत्तेत असताना त्यांनी एका रुपयाचीही मदत केली नाही,” असा आरोप केला. एकाच मुद्द्यांवरुन विरोधकांकडून होत असलेल्या टीकेबाबत त्यांनी “साधा पाकीटमारही न पकडता येणारे लोक मोठ्या गप्पा मारतात,” असा थेट टोला लगावत कार्यक्षमतेचा मुद्दा उचलून धरला. त्याचबरोबर भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचे समर्थन करताना, “सर्वगुणसंपन्न कोणी नसते; चूक झाली म्हणून राजकारण करणे अन्यायकारक आहे,” असे म्हणत आ.पाटील यांनी पक्षातील कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा संदेश दिला.


‘आपल्या ताकदीवरच ऊर्जा मिळते’ – मतदारांशी भावनिक आवाहन

आगामी प्रशासन पारदर्शक राहील असा विश्वास देत त्यांनी नागरिकांच्या सहभागाची गरज अधोरेखित केली.“मोठी प्रक्रिया उभारायची आहे; एकट्याने शक्य नाही. तुम्ही जशी ताकद द्याल तशी ऊर्जा आम्हाला मिळते,” असे सांगत आ. राणा जगजीतसिंह पाटील यांनी मतदारांना आवाहन केले.


भाजपची ही कॉर्नर सभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात वातावरण अधिक तापवणारी ठरली. विकासाच्या आश्वासनांवर भाजपचा भर विरोधकांवरील तीक्ष्ण टीका, स्थानिक पातळीवरील प्रकल्पांची मांडणी, शहराच्या यात्राधिष्ठित अर्थव्यवस्थेच्या विस्ताराचा मुद्दा या निवडणुकीत मतदारांना विकासाची दिशा, स्थानिक नेतृत्वावरचा विश्वास आणि पक्षांतील प्रतिमा या तीन घटकांवर निर्णय घ्यावा लागणार आहे. सभेनंतर भाजपच्या गोटात उत्साह जाणवत असला तरी अंतिम निर्णय मतदारांच्या हातीच आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top