तुळजापूर / सिद्दीक पटेल
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या जोरदार वातावरणात भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार विनोद (पिटू भैया) गंगणे यांच्याकडे पाठिंब्याची सर येऊ लागली आहे. स्थानिक सामाजिक संस्थांकडून होत असलेल्या घोषणांनी गंगणे यांच्या प्रचाराला ठोस गती मिळाल्याचे चित्र तयार झाले आहे.
शहरातील श्री तुळजाभवानी दिव्यांग सामाजिक व बहुउद्देशीय संस्था यांनी नुकतेच बैठकीत एकमताने पाठिंब्याचा निर्णय घेत, अधिकृत पत्र सुपूर्द केले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील दिव्यांग सुविधा, विकासाच्या गरजा आणि स्थानिक अडचणी यावर सविस्तर चर्चा करत शेवटी गंगणे यांच्यावर विश्वास दाखवला.
या पाठिंब्यानंतर शहरातील राजकीय समीकरणांना नवाच रंग चढू लागल्याचे जाणवते. विविध संघटनांकडून होणाऱ्या पाठिंब्याच्या हालचालींमुळे गंगणे यांच्या नावाभोवतीची निवडणूक रसिकता अधिकच वाढली असून त्यांचे नाव नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत ठळकपणे ‘फोकस’मध्ये आले आहे.
प्रचाराचा वेग वाढत असताना तुळजापूरमध्ये कोणत्या उमेदवाराच्या बाजूने कुठले सामाजिक गट उभे राहतात, यावर पुढील समीकरणे अचूक आकार घेतील. सध्या मात्र पाठिंबा घोषणांच्या मालिकेमुळे गंगणे यांच्या प्रचार मोहिमेला उठाव मिळाल्याचे स्पष्ट संकेत शहरभर चर्चेत आहेत.

