तुळजापुरात कडक बंदोबस्त; सावरकर चौक ते हेलिपॅड कॉर्नर मार्गावर प्रवेशबंदी

mhcitynews
0

तुळजापूर | प्रतिनिधी

तुळजापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा रविवार, दि. 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होत असून, मोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सावरकर चौक ते हेलिपॅड  कॉर्नर या मार्गावर प्रवेशबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तुळजापूर नगरपरिषदेची मतमोजणी प्रक्रिया श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे पार पडणार आहे. मागील काही दिवसांत शहरात दोन गटात हाणामारीच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर, मतदान दिवशी अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलिस निरीक्षकांनी प्रवेशबंदीची शिफारस केली होती.

त्यानुसार, दि. 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत सावरकर चौक ते हेलिपॅड कॉर्नर या परिसरात सामान्य नागरिकांचा प्रवेश प्रतिबंधित राहणार असून, केवळ आवश्यक व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

हा आदेश तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, तुळजापूर यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून जारी केला आहे. मतमोजणीच्या दिवशी शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top