तुळजापूर / सिद्दीक पटेल
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होताच केवळ शहरातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात राजकीय चर्चांना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक ११ मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामचंद्र रोचकरी यांनी आपल्या पहिल्याच निवडणूक प्रयत्नात तुळजापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम प्रस्थापित करत दणदणीत विजय मिळवला आहे.
रामचंद्र रोचकरी यांना तब्बल २,१२४ मते मिळाली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला केवळ ५०२ मते मिळाल्याने त्यांनी १,६२२ मतांचे विक्रमी अंतर राखत विजय खेचून आणला. हे मताधिक्य केवळ तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीतच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांमधील सर्वाधिक मताधिक्य ठरल्याने प्रभाग ११ ची लढत जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली आहे.
प्रभागातील सातत्यपूर्ण जनसंपर्क, स्थानिक प्रश्नांची अचूक मांडणी, तसेच भाजप संघटनेची भक्कम बूथ पातळीवरील यंत्रणा हे या यशामागील प्रमुख घटक मानले जात आहेत. त्यासोबतच तरुणाईचा उत्साह आणि अनुभवी नेतृत्वाचा समतोल चेहरा मतदारांना भावल्याचे चित्र आहे.
रामचंद्र रोचकरी यांची “काम करणाराच नगरसेवक” अशी प्रतिमा मतदारांमध्ये ठामपणे रुजलेली असून, त्याच विश्वासावर मतदारांनी एकतर्फी आणि विक्रमी कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
पहिल्याच प्रयत्नात जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य मिळवणे ही बाब केवळ वैयक्तिक यशापुरती मर्यादित नसून, भाजपसाठी जिल्हास्तरावर वाढत्या प्रभावाचे आणि संघटनात्मक ताकदीचे प्रतिक मानली जात आहे. या निकालामुळे आगामी काळातील नगरराजकारणातच नव्हे, तर जिल्हा पातळीवरील सत्तासमीकरणांवरही भाजपची बाजू अधिक मजबूत झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
.
