तुळजापूरमध्ये काका–पुतणीचा दणदणीत विजय; जगदाळे–साळुंखे कुटुंबाचा जनाधार पुन्हा सिद्ध

mhcitynews
0

तुळजापूर / सिद्दीक पटेल

तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपली पकड अधिक घट्ट करत शहरातील राजकारणात निर्णायक वर्चस्व प्रस्थापित केले आहे. प्रभाग क्रमांक १ आणि ४ मधून भाजपच्या उमेदवारांनी मिळवलेले स्पष्ट व भरघोस मताधिक्य हे केवळ विजय न ठरता, शहरातील मतदारांचा कल आणि संघटनात्मक ताकद दर्शविणारे ठरले आहे. या निवडणुकीत काका–पुतणीची जोडी चर्चेचा केंद्रबिंदू ठरली असून, ज्येष्ठ नेते पंडितराव देवीचंद जगदाळे आणि नवख्या पण प्रभावी नेतृत्व म्हणून पुढे आलेल्या श्वेता वैभव साळुंखे (जगदाळे) यांनी दणदणीत विजय संपादन केला.


प्रभाग क्रमांक १ मधून सलग चार टर्म नगरसेवक राहिलेले पंडितराव जगदाळे यांनी या निवडणुकीत पुन्हा एकदा आपली लोकप्रियता सिद्ध केली. त्यांनी १४३२ मते मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार अर्जुन हनमंत भोजने (३६८ मते) यांचा तब्बल १०६४ मतांच्या फरकाने पराभव केला. हा मतफरक केवळ या प्रभागापुरता मर्यादित न राहता, तुळजापूर शहर व जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्यांपैकी एक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तुळजापूर खुर्द परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून असलेले जगदाळे यांचे एकहाती वर्चस्व या निकालातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.


प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपच्या उमेदवार श्वेता वैभव साळुंखे यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत दमदार कामगिरी करत १२८२ मते मिळवली. त्यांनी महाविकास आघाडीच्या अमृता सुदर्शन वाघमारे (७६४ मते) यांचा ५१८ मतांनी पराभव करत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे श्वेता साळुंखे यांच्या विजयामागे त्यांचे सासरे, माजी नगराध्यक्ष सज्जनराव साळुंखे यांचे प्रभागातील मजबूत संघटन, अनुभव व जनसंपर्क निर्णायक ठरल्याचे स्थानिक नागरिक व राजकीय अभ्यासक सांगतात.


या दोन्ही विजयांतून भाजपची बूथ पातळीवरील रणनीती, कार्यकर्त्यांची एकजूट आणि मतदारांशी थेट संपर्क या घटकांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. एकीकडे अनुभवी नेतृत्वाचा विश्वास आणि दुसरीकडे नव्या पिढीचा उत्साह यांचा संगम असलेला हा काका–पुतणीचा विजय तुळजापूरच्या राजकारणात दीर्घकाळ चर्चेत राहणारा ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top