नाल्या, गटारी व सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबत काँग्रेस नगरसेवकांचे निवेदन
तुळजापूर | सिद्दीक पटेल
तुळजापूर शहरातील सर्व नाल्या, गटारी, परिसर तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांची तातडीने स्वच्छता करण्यात यावी व कचरा संकलनासाठी घंटागाडीची दररोज नियमित व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरामध्ये ठिकठिकाणी नाले व गटारी तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असून त्यातून दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून डास, माश्यांचा प्रादुर्भाव वाढत आहे. काही भागांमध्ये गटारींची चेंबर उघडी असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तुळजापूर शहर धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यास शहराच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून नाले, गटारी व परिसराची तात्काळ साफसफाई करावी, तसेच कचरा कुंड्यांची स्वच्छता करून घंटागाडी नियमित वेळेत सर्व भागात फिरवावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
निवेदनावर नगरसेवक अमोल माधवराव कुतवळ, अक्षय धनंजय कदम, रणजित चंद्रकांत इंगळे, आनंद नानासाहेब जगताप व प्रगती गोपाळ लोढे यांच्या स्वाक्षऱ्या असून नगर परिषद प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

