प्रतिक रोचकरी यांच्या पाठपुराव्यामुळे एस.टी. बससेवा पुन्हा सुरू
तुळजापूर / सिद्दीक पटेल
मागील तब्बल तीन वर्षांपासून बंद असलेल्या एस.टी. महामंडळाच्या बससेवेने तुळजापूर तालुक्यातील चिवरी गावातील नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः ठप्प झाले होते. विद्यार्थी, महिला, कामगार व ज्येष्ठ नागरिकांना शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच शासकीय कामांसाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. परिणामी आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता.
या गंभीर व ज्वलंत प्रश्नाची दखल घेत भारतीय जनता पार्टी युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रतिक रोचकरी यांनी थेट एस.टी. महामंडळाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधत समन्वयाने पाठपुरावा केला. केवळ निवेदनांपुरते न थांबता प्रत्यक्ष चर्चा, लोकांच्या अडचणी मांडत ठोस प्रयत्न करण्यात आले.
चिवरी गावात पुन्हा एस.टी.बससेवा सुरू होताच गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून विशेषतः विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, कामगारांना रोजगारासाठी व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यसेवेसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. ही केवळ बससेवा सुरू होण्याची बाब नसून, ग्रामीण भागातील मूलभूत सार्वजनिक सुविधांच्या पुनर्स्थापनेचा विजय मानला जात आहे. लोकप्रतिनिधी व संघटनात्मक नेतृत्वाने जबाबदारीने पुढाकार घेतल्यास प्रशासनही सकारात्मक प्रतिसाद देते, याचे हे ठळक उदाहरण ठरले आहे.
"जनतेच्या मूलभूत गरजांसाठी सातत्याने लढणं आणि प्रश्न मार्गी लावणं हीच माझी भूमिका आहे. चिवरी गावातील नागरिकांच्या संयमाला आणि विश्वासाला आज न्याय मिळाला असल्याचे मत दैनिक त्रिशक्तीशी बोलताना प्रतिक रोचकरी व्यक्त करत एस.टी. बससेवा सुरू करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांचेही त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. तीन वर्षांचा संघर्ष, सातत्याचा पाठपुरावा आणि लोकहिताचा ठाम आग्रह — यामुळे चिवरीकरांना अखेर न्याय मिळाला, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
