प्रभाग क्रमांक ११ मधील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची मागणी

mhcitynews
0

 


तुळजापूर | प्रतिनिधी

तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील घनकचरा व्यवस्थापनासाठी असलेला कचरा संकलन डेपो नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत असल्याने तो तातडीने इतरत्र हलविण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक रामचंद्र (आबा) रोचकरी व नगरसेविका सौ. अश्विनीताई विशाल रोचकरी यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


सद्यस्थितीत सदरील कचरा डेपो हा दाट लोकवस्तीच्या परिसरात असून तेथून येणारी तीव्र दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य व डास, माश्यांचा प्रादुर्भाव यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


विशेष म्हणजे, या ठिकाणी नवीन न्यायालयाची इमारत तसेच शासकीय कार्यालयांचे कामकाज सुरू असून अशा परिसरात कचरा संकलन केंद्र असणे हे स्वच्छता व नियोजनाच्या दृष्टीने अयोग्य असल्याचेही नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले आहे.


या निवेदनाच्या अनुषंगाने नगराध्यक्ष विनोद (पिटू) गंगणे यांनी सकारात्मक भूमिका घेत येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रभाग क्रमांक ११ मधील कचरा डेपो दुसऱ्या योग्य ठिकाणी हलविण्याबाबतची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.


नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असून, लवकरात लवकर कचरा डेपो स्थलांतरित करण्यात यावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top