तुळजापूर प्रतिनिधी
मनुष्य जन्माचा उद्देश हा भगवंत प्राप्ती असून केवळ मनुष्य जन्मातच हे शक्य आहे, असे प्रतिपादन प्रजापती विष्णुदास - इस्कॉन धाराशिव यांनी केले. जिजामाता नगरातील श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात पहाटे पाच वाजता मंगल आरती झाली. त्यानंतर इस्कॉन धाराशीव व हरे कृष्ण भक्त तुळजापूर आयोजीत एकादशी निमित्तच्या सायंकाळी सहा वाजता झालेल्या प्रवचनात ते बोलत होते. मनुष्याने नवीन वर्षाचा संकल्प हा भगवंत प्राप्तीसाठी करावा, असे ते म्हणाले. भक्ती विना जीवन व्यर्थ आहे. मनुष्याने सहनशीलता, दया, मैत्री भाव, शांत स्वभाव व शास्त्रानुसार आचरण ठेवावे. या गोष्टी जर आचरणात आणल्या तरच याच जन्मात भगवंत प्राप्ती होऊ शकते, असे प्रभुजींनी सांगितले. दररोज भगवंतांचा जप केलाच पाहिजे तसेच प्रत्येक पदार्थ हा भगवंतांना भोग (नैवेद्य) लावूनच आपण ग्रहण केला पाहिजे त्यामुळे तो पदार्थ पदार्थ न राहता प्रसाद बनतो. मनुष्याने खाताना व बोलताना जिभेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कारण यामुळेच पुढील अनर्थ टळतात. अनेक जण नवीन वर्षात वेगवेगळे संकल्प करतात परंतु प्रत्येकाने भगवंत प्राप्ती हाच नवीन वर्षाचा संकल्प करावा व त्यानुसार आचरण ठेवावे, असे प्रभुजीने सांगितले. यावेळी सर्व उपस्थितांकडून भगवंताना पुष्पाभिषेक करण्यात आला.
तसेच चार जानेवारीच्या नगरसंकीर्तनात सर्व शहरवासियांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी श्रीमान प्रजापती विष्णुदास यांनी केले. प्रवचनासाठी 125 ते 150 भाविक भक्त उपस्थित होते. माऊली महिला भजनी मंडळाने उपवास प्रसादाची व्यवस्था केली होती. शेवटी संकीर्तनाने सांगता झाली.
