नवख्या नगरसेवकाचा पहिला घाव जनहितावर; रोचकरी बंधू थेट कामात

mhcitynews
0

तुळजापूर | सिद्दीक पटेल

नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर केवळ पदाचा सन्मान न मिरवता, पहिल्याच दिवसापासून थेट जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून देणारे नगरसेवक म्हणून श्री. रामचंद्र (आबा) सुखदेव रोचकरी यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. निवडीनंतरचे त्यांचे पहिलेच काम थेट नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याने शहरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.


तुळजापूर–नळदुर्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५२ वरील गोलाई चौक ते मंगरूळ पाटी या परिसरात रस्त्याचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण सुरू असून या भागात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. या मार्गावरून विद्यार्थ्यांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगाने धावत असून वारंवार अपघात घडत आहेत.


या गंभीर समस्येची दखल घेत नगरसेवक रोचकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सोलापूर येथील कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन देत सदर ठिकाणी तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, तसेच भविष्यातील अपघात टाळावेत, यासाठी आवश्यक उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.


“नगरसेवक म्हणून निवड ही केवळ सन्मानाची बाब नसून जनतेच्या प्रश्नांसाठी सतत लढण्याची जबाबदारी आहे,” असल्याचे मत सिटी न्यूजशी बोलताना रोचकरी यांनी व्यक्त केले. त्यांच्या या तत्परतेमुळे नागरिक, पालक व विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त होत असून ‘हा खऱ्या अर्थाने जनतेतला नगरसेवक’ अशी प्रतिक्रिया उमटत आहे. पहिल्याच कामातून जनहिताचा ठसा उमटवणारे रोचकरी पुढील काळातही शहरातील मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका घेतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top