तुळजापूर प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ - इस्कॉन धाराशीव व हरे कृष्ण भक्त तुळजापूर यांच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य नगर संकीर्तनास शहरवासियांचा उदंड प्रतिसाद मिळाला . हरिनाम संकीर्तनास दोन वर्षे पूर्ण होऊन तिसऱ्या वर्षात पदार्पण करत असल्याने आजचे नगर संकीर्तन विशेष होते . सकाळी 08: 11 वा . श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदीर, कासार गल्ली येथून संकीर्तनास प्रारंभ झाला . कलियुगात भगवान श्रीकृष्णांचे पवित्र नामस्मरण हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे . हरिनाम संकीर्तनाने भक्तीभाव वाढतो, वातावरण शुद्ध होते, आध्यात्मिक शांती लाभते म्हणूनच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी असे नगर संकीर्तन शहरातील वेगवेगळ्या भागात काढण्यात येते .
संकीर्तना दरम्यान वाटेत ठिकठिकाणी पुष्पहार घालून श्रीराम फेरीचे स्वागत करण्यात आले . कांही ठिकाणी भक्तांना मसाला दुधाचे वाटप करण्यात आले . सर्व प्रभूजी व माताजी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाल्याचे दिसत होते एकूणच संपूर्ण वातावरण भक्तीरसात न्हाऊन गेले होते . शेवटी श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात श्री सुहास साळुंके ( मा . नगराध्यक्ष ) यांच्या वतीने प्रसाराची व्यवस्था करण्यात आली होती . आजच्या नगर संकीर्तनासाठी 250 ते 300 भाविक भक्त उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते .
