तुळजापूर - प्रतिनिधि
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ - इस्कॉन धाराशीव व हरे कृष्ण भक्त तुळजापूर आयोजित श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी भव्य रथयात्रा उत्साहात संपन्न झाली . मंगळवारी दुपारी 2:30 वा. इस्कॉन पंढरपूरचे वरीष्ठ भक्त, कथा प्रवक्ते श्रीमान श्रवण भक्ती प्रभूजी यांच्या शुभहस्ते आरती करून व नारळ फोडून इच्छापुर्ती गणेश मंदीर येथून रथयात्रेस प्रारंभ झाला .
बस स्टॅण्ड, भवानी रोड, महाद्वार, आर्य चौक, पावणारा गणपती मार्गे श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदीर जिजामाता नगर येथे सांगता करण्यात आली . यात्रे दरम्यान भाविक मोठ्या उत्साहाने रथावर पुष्ण वर्षाव करत होते . बाहेर गावाहून देवी दर्शनासाठी आलेले भाविकही हरिनामात दंगून गेलेले दिसत होते . दिवसभर सतत पाऊस असूनही पावसातही भाविकांचा उत्साह वाढतच होता . पाच वर्षापासूनच्या बालकापासून ऐंशी वर्षाच्या पर्यंतच्या अबाल-वृद्धांनी रथयात्रेत उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला .
आयोजकांनी सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप केले . योग्य नियोजन असल्याने रथयात्रा यशस्वीपणे संपन्न झाली . रथ यात्रेसाठी पंढरपूर, धाराशीव, उमरगा, नंदगाव येथून वैष्णव भक्त आले होते . शेवटी विठ्ठल मंदिरात झालेल्या आरतीने व महाप्रसादाने रथयात्रेची सांगता झाली . यामध्ये 400 _ 450 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .

