पवनचक्कीच्या विद्युत वाहिनी चोरीचा पर्दाफाश; LCBची कारवाई

mhcitynews
0


चोरीच्या तारा विकत घेणाऱ्यासह पाच जण ताब्यात; ११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव प्रतिनिधी 

पवनचक्कीच्या नवीन विद्युत वाहिनीवरील अॅल्युमिनियमच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. मांडवा शिवारात कारवाई करत पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून, चोरीच्या तारा खरेदी करणाऱ्या एकालाही पकडण्यात आले आहे. या कारवाईत तांब्याची व अॅल्युमिनियमची तार, पिकअप वाहन आणि दोन मोटारसायकली असा एकूण ११ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ५ ऑक्टोबर रोजी मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी मांडवा शिवारात शाम अजिनाथ शिंदे व त्याचे साथीदार येरमाळा व वाशी परिसरातील पवनचक्कीच्या नवीन विद्युत वाहिनीच्या तारा चोरी करून पिकअपमध्ये भरत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी मांडवा शिवारात छापा टाकला. त्याठिकाणी एक पिकअप व दोन मोटारसायकली आढळून आल्या. पिकअपमध्ये ८ ते १० इसम तारांचे बंडल भरताना पोलिसांना दिसले. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळ काढला. त्यापैकी पाच जणांचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये शाम अजिनाथ शिंदे (वय २६, रा. मांडवा), लाला गोविंद पवार (वय २४, रा. जुनी दूध डेअरी, धाराशिव, सध्या मांडवा), आकाश श्रीरंग पवार (रा. वरुडा), पवन कालीदास काळे (वय २२, रा. वरुडा) आणि पिकअप चालक अंगद प्रल्हाद शिंदे (वय ३२, रा. घोसापुरी, जि. बीड) यांचा समावेश आहे. यावेळी पळून गेलेल्या अन्य चार संशयितांचीही नावे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

चौकशीत ताब्यातील संशयितांनी तेरखेडा, इंदापूर आणि ढोकी शिवारातील पवनचक्कीच्या नवीन पोलवरील विद्युत वाहिनी कट करून तारा चोरल्याची माहिती दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच चोरीच्या तारा धाराशिव येथील जाकेर निजाम शेख याला विकल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्यालाही ताब्यात घेतले.

या प्रकरणात पोलिसांनी येरमाळा पोलीस ठाण्यात संशयितांना हजर करून चार चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याचे सांगितले आहे. कारवाईत तांब्याची तार, अॅल्युमिनियमची तार, पिकअप वाहन आणि दोन मोटारसायकली असा एकूण ₹११.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, ताब्यातील शाम अजिनाथ शिंदे हा नळदुर्ग पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यात फरार आरोपी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पथकात पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर तसेच क्यूआरटी पथकातील आदित्य बालवाड, रितेश चारले, महेश खरात, चापोह महेबुब अरब, सुभाष चौरे, रोहित दंडनाईक व प्रकाश बोईनवाड यांचा सहभाग होता.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top